Close

आतंकवादी हल्ल्यांकरता कुणाला दोषी मानायचं?

आतंकवादी हल्ल्यांकरता कुणाला दोषी मानायचं?

The article has been translated into Marathi by Prof. Manohar Railkar

एकूण पाहता, सध्या युरोपातील परिस्थिती कमालीच्या धोक्याच्या पातळीवर पोचली आहे. एकट्यादुकट्या स्त्रीला रस्त्यातून जाणं तर धोकादायक वाटतंच. पण रात्रीच्या वेळी पुरुषसुद्धा एकट्यानं हिंडायला धजावत नाहीत. सर्वत्र संरक्षकांची वाढ करण्यात आली आहे. आणि स्वसंरक्षणाकरता फवारे वापरण्यातही वाढ झाली आहे. पण, संरक्षणात वाढ, अधिक संख्येनं पोलिसांत वाढ, असं सगळं असलं तरी दुर्दैवानं मूळ प्रश्नाचा विचार व्हावा तसा झाल्याचं आढळत नाही.

नाताळात बर्लिनमध्ये आतंकी हल्ला झाल्याचं तुम्हाला माहीतच आहे. त्यात बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ चॅन्सेलरबाईंनीसुद्धा पांढऱ्या गुलाबाची फुलं वाहिली. आणि का? का? (Warum) असा प्रश्न असलेले मोठ्या फलकही सर्वत्र दिसतात. ज्यांनी निर्वासितांचं मोठ्या अंतःकरणानं तेव्हा प्रथम स्वागत केलं, त्या सज्जन, सभ्य, साध्या जर्मनांनाही का? हा प्रश्न तर आता सतावीत आहेच. पण राजकीय पुढाऱ्यांचीही त्या प्रश्नानं पाठ सोडली नाही. ह्या इस्लामी आतंकवाद्यांना पराभूत कसं करायचं, आणि त्यांच्या असल्या कृष्णकृत्यांमागील प्रेरणा कोणती?

गेली काही दशकं युरोपीयांनी परस्परांतील प्रेमभावाचं चांगल्या प्रकारानं जतन केलं, तो वाढवला आणि जातपात, संप्रदाय, राष्ट्रीयत्व ह्या सर्वांच्या वर येऊन आपण सर्वजण ह्या जगाचेच नागरिक आहोत, ह्या भावनेची जोपासना केली. त्या सर्वांत स्वीडनचा पुढाकार होता. दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात स्वीडन, आफ्रिका, आशिया अशा विविध देशांतील लहान मुलं जमून, हातात हात घालून, नाचत नाचत, स्वीडन कसा आम्हा सर्वांचा देश आहे, अशा प्रकारानं परस्परांनी प्रेम करणं किती आनंददायी आहे, अशा अर्थाची गाणीही म्हणत होती.

उदारमतवादी जगात, सर्व प्रकारचे भेदभाव विसरून सर्व मनुष्यमात्रांनी परस्परांशी बंधुभाव बाळगावा ही कल्पना आकर्षक वाटणं स्वाभाविक आहे. ती उचलून न धरल्याबद्दल, आणि जिहादी धोकादायक असल्याचे ते सांगतात, ह्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना दोष देण्यात येतो. अँजेला मार्केल (जर्मनीच्या प्रमुख, चॅन्सेलर) ह्यांना अध्यक्ष म्हणून ते निवडून आल्यावर अभिनंदन करताना त्यांना ह्या उदारमतवादाचं स्मरणही करून दिलं.

परंतु, ज्यानं आपले डोळे उघडे ठेवले आहेत, त्या कुणालाही प्रत्यक्ष जागतिक परिस्थिती, केवळ स्वीडनच नव्हे तर सर्वत्र, ह्या उदारमतवादाच्या अगदी नेमकी उलट आहे, हे कटु सत्य दिसतं. पण, प्रचंड प्रमाणात युरोपात झालेल्या निर्वासितांच्या प्रवाहामुळं युरोपाची अवस्था पार बिघडून गेली आहे. युरोपचं स्वास्थ्य पूर्णपणं नष्ट झालं आहे.  सर्वच परिस्थिती कमालीची हाताबाहेर गेली आहे. आणि त्यातून गुन्हेगारीतली वाढ तशीच आकाशाला भिडली आहे. भयानक अत्याचारांची भीती सर्वत्र व्यापून राहिली आहे. उदारमतवाद्यांकडून त्यामागील कारणांबद्दल स्पष्टीकरण अपेक्षित आहे. पण, एक तर ते दांभिक तरी असावेत नाही तर ठार अज्ञानी तरी असावेत.

नव्या जगात सांस्कृतिक बदल अपेक्षितच आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. पण, संस्कृतीचं असं बहुविध रूप सर्वसामान्यांना रुचणारं नाही. त्या सर्वांना आपापलं पारंपरिक सांस्कृतिक जीवनच हवं आहे. परिणामी आमच्या समोर आता एक भलामोठा यक्षप्रश्न आ वासून उभा आहे. राष्ट्रवादी उजव्या गटाची सरशी होत आहे. आणि ही परिस्थिती दुर्दैवी आहे, असं आम्हाला सांगण्यात येत आहे.

ती दुर्दैवी आहे, इतकं म्हणून ते थांबत नाहीत, तर ते उजव्या गटाच्या लोकांना फॅसिस्ट, नाझीवादी, नव्या विचारसरणीच्या विरोधी, मुस्लीमद्वेष्टे आणि त्यांच्या विरोधी वातावरण पसरवणारे, अशा शिव्याही देत आहेत. आणि त्याच दमात ते स्वतःला उदारमतवादी म्हणवून टेंभाही मिरवीतच आहेत.

त्यातही युरोपात नव्यानं प्रवेश करणाऱ्या त्या निर्वासितांना स्वतःला उदारमतवाद प्रिय आहे का, असा प्रश्न कुणी विचारलाच तर आरडाओरड करून त्याला गप्प बसवण्यात येतं, पण निर्वासितांना कुणी कधीच दोष द्यायचा नाही, हेच तर त्यांचं मुख्य ध्येय आहे. आणि अन्य संप्रदायामुळं अराजकसदृश परिस्थिती उद्भवल्याचं मान्य करायचं नाही, हे दुसरं. वर मुसलमानांना तर मुळीच दोषास्पद मानायचं नाही. ख्रिश्चनतेवर टीका करायला आडकाठी नाही, हिंदुत्वाला शिव्या देण्याला मुळीच बंदी नाही. पण, इस्लाम?  त्या बाबतीत तोंड बंद. सध्याच्या संघर्षाला इस्लाम उत्तरदायी आहे, असं बोलायलाही बंदी, नव्हे त्यालाच, उलट, आमच्या उदारमतवादी समाजात बंदी बनवण्यात येतं.

असं का? स्वतः इस्लाम उदारमतवादी नाही, ह्या तथ्याकडे तथाकथित उदारमतवादी कानाडोळा का करतात? ख्रिश्चनतासुद्धा तशी नाही, हे सत्यच आहे. आणि ते त्याही संप्रदायानं छपवलेलं नाही. जर मरणोत्तर नरकाग्नीत जळायचं नसेल तर प्रत्येकानं आपापल्या संप्रदायाला धरून राहिलंच पाहिजे, असा ह्या  दोघांचाही हट्ट असतोच.

आता, बायबलला शरण गेल्याविना पर्याय नाही, किंवा तसा ठाम विश्वास असणाऱ्यांची संख्या  जेव्हा जगातील अर्ध्या लोकसंख्येइतकी असते, तेव्हा उदारमतवादाचा उदय होणार कसा? चौथा हिस्सा जनसंख्या म्हणते, बायबल आणि जीझस ह्यांचंच अनुकरण करा आणि आणखी एक चौथा हिस्सा जनसंख्या म्हणते अल्ला, कुराण ह्यांवरच विश्वास ठेवायला हवा, तेव्हा हा प्रश्न खरं तर दिसतो त्यापेक्षा अधिकच गुंतागुंतीचा होतो

.आपल्या म्हणण्याचा परिणाम इतका संकुचित होईल, असं जीझस किंवा अल्ला ह्यांना वाटलं होतं का, हा प्रश्न नाही. किंवा इतक्या संकुचित विचारांना पाठिंबा नाकारणारी वचनं त्या ग्रंथांत आहेत किंवा कसं, हाही प्रश्न नाही. पण, इतक्या संकुचित विचारांचा प्रभाव सहस्र वर्षांपेक्षा अधिक काळ राहिला आणि आजही लहान बालकांच्या मनावर दिसून येतो आणि ते थांबवायचा कुणीही प्रयत्न करीत नाही.

फ्रांकफुर्त राज्याचे सुरक्षा-अधिकारी वूल्फगांग त्रुशाइम (Wolfgang Trusheim) ह्यांचा वृत्तांत चिंताजनक आहे: शाळकरी मुलांना इतक्या लहान वयात असं संप्रदायांध बनवणार का? मग वाढत्या वयात त्यांची वृत्ती कशी राहील? ते जिहादी बनतील, तथाकथित अश्रद्धांना ठार करतील. ती मुलं म्हणतात, “तुमच्यासह फूटबॉल खेळायला आम्हाला मान्यता नाही. पण, मोठेपणी आम्ही तुम्हाला ठार करणार. कारण तुमची अल्लावर श्रद्धा नाही. ”

जर्मन शाळेतील काही मुस्लीम मुलांबद्दल एक चित्रपट्टी आहे. जर्मन मुलं वाईट असतात, म्हणून त्यांच्यासह मैत्री करू नका, अल्ला त्यांना नरकात पाठवणार आहे, असं ६ ते १० वर्षांच्या मुलांना, त्यांचे शिक्षक सांगत असल्याचं त्या चित्ररट्टीत दिसतं.

दक्षिण जर्मनीच्या एका बाजारात, ११ वर्षांची मुलं बाँब ठेवताना सापडली. प्रश्न असा काफिरांना ठार करण्याच्या त्या मुलांच्या अशा प्रवृत्तीबद्दल त्यांना दोष देता येईल का?

अल्लाला केवळ मुस्लीमच प्रिय असतात, त्याला काफिर आवडत नसल्यामुळं त्यांना अंतिम निवाड्याच्या वेळी तो नरकाग्नीत जाळून टाकणार आहे. मौलाना अबुल कलम आझाद भारताचे पहिले शिक्षण मंत्री असूनही, खिलाफत चळवळीत भाग घेण्यास आणि पॅन-इस्लामिक चळवळीच्या जिहादी मोहिमांत भाग घेण्याला प्रवृत्त करीत! अशा अवस्थेत मुसलमानांचा विचार बदलेल कसा? कारण आपल्या असा कृतीमुळंच नरकाग्नीत न जळता, उलट, स्वर्गातील आपली जागा राखून ठेवली जाईल असा त्यांचा श्रद्धापूर्ण विश्वास असतो ना?

प्रत्येकाला एकच जन्म असतो, असा इस्लाम आणि ख्रिस्ती संप्रदायांचा ठाम विश्वास असतो ना? ५५३ साली झालेल्या ख्रिस्ती परिषदेत पुनर्जन्मावर विश्वास ठेवण्यावर बंदी घालण्यात आलीच होती. त्या वेळी इस्लामचा तर जन्मही झाला नव्हता. एकच जन्म असल्याच्या कल्पनेवर विश्वास असण असल्या संप्रदायांना सोयीचंही होतंच. त्या कल्पनेमुळं अनुयायांना इकडे तिकडे भरकटण्यापासून निरनिराळे प्रयोग करण्यापासून रोखता येतं आणि त्याकरताच नरकाग्नीची कल्पना सत्य असल्याचं बालवयातच मुलांच्या गळी उतरवण्याला दोन्ही संप्रदायांनी प्राधान्य दिलं. “न जाणो नरकाग्नीची कल्पना खरी असली तर!” अर्धकच्च्या ख्रिश्चनांचं आणि मुसलमानांचंसुद्धा, त्या अपराधी भावनेनं आयुष्य भीतीदायक झालं आहे.

मौ. वहिद्दुदीन खान ह्यांच्यासारख्या बाह्यतः तरी सत्प्रवृत्त वाटणाऱ्या व्यक्तीलासुद्धा ही मूलभूत कल्पना सोडवत नाही, असं दिसतं. कारण त्यांच्या कुराणातील ज्ञान (“Quranic wisdom) ह्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर ह्या तत्त्वाचा उल्लेख आहेच.

कुराणानुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचे दोन हिस्से असतात, मरणपूर्व आणि मरणोत्तर काळ. आत्ताचं (मरणपूर्व) आयुष्य केवळ तात्कालिक असून केवळ आपली परीक्षा असते. त्यात आपण कसे उतरतो, त्यानुसार मरणोत्तर आपला निवाडा केला जातो. ह्या तथ्यावर प्रत्येकाचा विश्वास बसावा ह्याचा कुराणचा प्रयत्न असतो. म्हणून प्रत्येकानं आपलं आताचं (मरणपूर्व) आयुष्य कसं व्यतीत केलं आहे, त्याप्रमाणं, त्याला स्वर्गप्राप्ती होईल किंवा कसं ते ठरतं.

सच्च्या मुसलमानांकरताच स्वर्ग राखून ठेवण्यात आला असून इतर ढोंगी आणि काफिरांकरता तो उपलब्ध नसल्याची माहिती कुराण वाचून मिळते. मग सच्च्या मुसलमानाचं कर्तव्य काय? इतर मुसलमानांसह सद्वर्तन असावं (आणि अश्रद्धांशी कठोर) इतर नियमांचं पालन करण्याबरोबर जिहादामुळं स्वर्गप्राप्तीही निश्चित होते. उलट त्याला स्वर्गात अधिक उच्च स्थान मिळतं (कुराण ४.९५). मग, आपापल्या अपराधातून सुटण्यासाठी गुन्हेगारसुद्धा जिहादी बनतात, ह्यात आश्चर्य ते काय? त्यांना राक्षस म्हणावं की आपण त्यातून ईश्वरी इच्छेचाच आदर करीत असतो अशा आपल्या (चुकीच्या) श्रद्धांचं पालन करण्याबद्दल त्यांचा गौरव करावा?

कुठं तरी घोर चूक होते आहे. अन्य व्यक्तींना ठार केल्यामुळं तो जगन्नियंता, तो सर्वोच्च परमात्मा आपल्याला शाबासकी देतो, हे काही ग्रंथांचं सार ठरू शकत नाही. पण हे इतरांच्या लक्षात आणून अन्यांचा बळी घेण्यापासून त्यांना अडवावं, आणि मुस्लीम तरुणांचं भवितव्य काळं होण्यापासून त्यांनाही वाचवावं, हे सांगण्याचं उत्तरदायित्व प्रौढांचं नव्हे काय?

विशेषे करून हिंदू आणि बौद्धांनी ह्या चुकीच्या प्रवृत्तीला आव्हान द्यायला हवं. आपापल्या संप्रदायांचा पाठिंबा आहे, इतक्याच करता ते तत्त्व आदरणीय कसं? केवळ ख्रिस्ती आणि मुस्लीमांना संरक्षण असं का?

त्याला काही कारण आहे: जेव्हा केव्हा हे स्वमतांध संप्रदाय उदयाला आले, तेव्हाच सर्व मानवजातीला आपल्या असल्या अधश्रद्धांना जुंपण्याचं त्यांनी ठरवलं, त्या मताबद्दल शंका उत्पन्न करण्याला अपराध मानलं गेलं. आजही टीकेला घातलेली बंदी अधिक सभ्य तरी आहे. आणि युनोप्रमाणं प्रत्येकाला आपापल्या संप्रदायांचं पालन करण्याला मुक्तता असली तरी आविष्कार-स्वातंत्र्य असं निरंकुश नाही.

आपापल्या संप्रदायाचं पालन करण्याला मुक्तता म्हणजे तरी काय सर्व जगाला इस्लाम बनवण्याचा मुस्लीमांना हक्क? सर्व जगाला ख्रिस्ती करण्याचा ख्रिस्त्यांना हक्क? हिंदूंना हिंदू राहण्याचा हक्क आहे काय? आणि इतर संप्रदायांना नष्ट करण्याचा अधिकार? त्या तत्त्वामुळं ख्रिस्ती आणि मुस्लीमांना मिळत असेल तर तसा तो हिंदूंनाही आहे काय?

जगातील व्यक्तींचे आंतरराष्ट्रीय नागरी आणि राजकीय अधिकार (International Covenant on Civil and Political Rights (ICCPR)) ह्याबद्दलच्या कलम २० अनुसार सांप्रदायिक विद्वेष, आणि त्यांतून उद्भवणारं शत्रुत्व व हिंसाचार निषिद्ध ठरवण्यात आले आहेत.

पुन्हा मानवी अधिकारांबद्दल युरोपीय परिषदेनंही (the European Convention on Human Rights (ECHR)) उच्चार स्वातंत्र्य बहाल करताना काही बंधनं घातली आहेत. त्यांनुसारही इतरांच्या अधिकारांवर गदा येणार नाही हे पाहणं अत्यावश्यक ठरतं.

परंतु, जगभर सांप्रदायिक पातळीवर ह्या नियमांचं उल्लंघन होत राहतंच आहे. तरीही ते थांबवण्याचं उत्तरदायित्व ज्यांच्यांवर आहे ते त्याकडे दुर्लक्ष करीत राहतं हे अधिक धोकादायक होय.

अशा अवस्थेत, “अन्य संप्रदायाचे त्यांचे विद्यार्थिमित्र अंतिम निवाड्यानंतर नरकाग्नीत जळत राहतील,” असं एखादा पाद्री आपल्या मुलांना सांगतो तेव्हा ह्या कायद्यांच पालन होतं, असं कसं म्हणता येईल? असा भेदाभेद करण्याचं स्वातंत्र्य कुणा पाद्र्यांना पवित्र बायबलनं दिलं आहे काय? आणि असलं विद्वेष पसरवणारं वाक्य उच्चारण्याचं स्वातंत्र्य ज्या पुस्तकानं दिलंय ते आदरपात्र होईल काय? अशी परस्परविरोधी तथ्यं ईश्वरी सत्य म्हणून सांगणारी अनेक पुस्तकं आहेत. त्यांच्यांवर सरळ सरळ विश्वास कसा ठेवायचा? आणि त्यांना कायद्यानं रक्षण का दिलं जावं? नेमकं सत्य काय आहे, ह्यावर खुली चर्चा का केली जाऊ नये?

असे पुष्कळ प्रश्न असून ते विचारण्याचं धाडस केलं जात नाही. आणि ज्यांनी सांप्रदायिक अधिकार सांगणाऱ्या घटनेचे ग्रंथ बनवले, लिहिले, ते युनोतील सदस्यही त्यांचा विचार करीत नाहीत.

आपल्या पुढं असले परस्पर विरोधी विचार मांडणारे सांप्रदायिक दृष्टिकोन समोर ठाकले आहेत. काफिरांना ठार करणं योग्य आहे, अल्लाला जगात केवळ मुस्लीमच राहायला हवे आहेत, ह्याविषयी तरुण जिहादीची पक्की खात्रीच असते.

तद्वतच, “अंधारात चाचपडणाऱ्या” लोकांना बाप्तिस्मा देऊन (म्हणजे बाटवून) ख्रिस्ताच्या प्रकाशात आणणं हे आपलं कर्तव्य असल्याबद्दल तरुण ख्रिस्ती मिशनऱ्याचीही बालंबाल खात्री असते.

प्रत्यक्षात सत्तेकरता चाललेल्या साठमारीत जिहादी काय किंवा ख्रिस्ती मिशनरी काय ही कुणाच्या तरी हातातील प्यादीच असावीत. सर्व देशांतील विद्यार्थ्यांना बुद्धिवादी इस्लामी (तालिबानी) होण्याकरता उत्तेजन दिलं जातंच ना? आणि त्याकरता आपले अभ्यासक्रम संप्रदायाच्या शिकवणुकीवर आधारून त्यात, अफगाणिस्तानात आतंकवाद आणावा, असंही सांगितलं जातंच ना? का? कारण त्यांनी सोवियट रशियाविरुद्ध भयानक सांप्रदायिक लढा द्यावा ह्याकरताच ना? तोही स्वार्थाकरताच ना? (वॉशिंग्टन पोस्टचा दुवा पाहा.)

एकदा असत्य बालकांच्या हृदयांत बिंबलं की ती तरुण झाल्यावर त्यांच्या अंतःकरणांतून काढून टाकणं सोपं नसतं. ते आपापल्या श्रद्धांशी एकरूप होऊन जातात. त्यातच आसपासही तसलंच वातावरण असेल तर मग ते अशक्यच होऊन बसतं.

जिथं कुणीही निर्भयपणं प्रश्न विचारू शकतील, असं खुलं वातावरण हवं आणि त्यांना त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरंही मिळायला हवीत, पवित्र ग्रंथाना स्पर्शही होता कामा नये, असं वातावरण नको. असं वातावरण अलीकडे पश्चिमेत ख्रिश्चन संप्रदायाच्या बाबतीत आहे. पण इस्लाम धर्मात त्याचा पूर्णपणं अभाव आहे.

कुणाही जीवाला केवळ एकच जन्म असतो की पुनर्जमन्माचीही शक्यता असते, ह्यावर चर्चा करून आरंभ करावा. जगात इतक्या प्रमाणावर अन्याय का चालू असतात, ह्यावरही विचारविनिमय होणं आवश्यक आहे. कांहीना चांगलं संगोपन करणारे आईवडील लाभतात, तर काहींना दारुबाज आईवडील मिळतात, ते का? जगात सर्व ख्रिस्तीच असावेत किंवा मुसलमानच असावेत, असं त्या सर्वोच्च शक्तीला वाटत असेल तर त्यानं त्यानं असा पक्षपात का करावा? लक्षावधी, नव्हे कोट्यवधी जीवांना नरकाग्नीत जाळण्याइतका तो जगाचा निर्माता (तो किंवा ती?) क्रूर असू शकेल का? आणि त्याचं कारण केवळ त्या जीवांची त्याच्यावर कितीही श्रद्धा असली तरी त्या सर्वोच्च शक्तीला इतर कोणत्या तरी नावानं हाक मारतात म्हणून?

ज्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे (त्यांना त्याची खात्री आहे?) त्यांचा युक्तिवाद कितीतरी रास्त आहे. व्हर्जिनिया विद्यापीठात तर ३,००० पेक्षा अधिक प्रकरणांची नोदच केलेली आढळते. त्यातून प्रत्येकाला सहस्रावधी पुनर्जन्म असतात, ह्या हिंदूंच्या प्रतिपादनाला पुष्टीच मिळते.

असल्या विषयांची चर्चा अगदी खुल्या वातावरणात करता आली तर मानवजातीला पुष्कळ लाभ होईल. अन्यांवरही विश्वास ठेवा, ही कल्पना पुन्हा उदयाला येईल. आणि मग उदारमतवादी जगाला खरोखराचं अस्तित्व लाभेल.

काही दुराग्रही धर्ममार्तंडांना दूर व्हावं लागेल. पण, उदारमतवादी नसलेल्यांनाही उदारमतवाद्यांकडून संरक्षण लाभेल.

Disclaimer: The facts and opinions expressed within this article are the personal opinions of the author. IndiaFacts does not assume any responsibility or liability for the accuracy, completeness, suitability, or validity of any information in this article.

Maria Wirth

Maria Wirth is a German and came to India on a stopover on her way to Australia after finishing her psychology studies at Hamburg University. She dived into India’s spiritual tradition, sharing her insights with German readers through articles and books. She is the author of the book “Thank you India – A German woman’s journey to the wisdom of Yoga”.