भारतामधील जातिव्यवस्थेला आणि ब्राह्मणांना ठोकणे, ह्यामागं एक सुसूत्र योजना आहे
The article has been translated from English by Professor Manohar Railkar
पश्चिमेकडील सामान्य लोकांना भारताविषयी खरी माहिती फारच थोडी असते. मात्र, भारतामधील जातिव्यवस्था अमानुष आहे इतकी एक बाब सर्वांना माहीत आहे. आणि ती व्यवस्था त्यांच्या हिंदुधर्माचंच महत्त्वाचं अंग आहे, असंही बहुतेकांना माहीत आहे. सर्व जातीतील ब्राह्मण जात सर्वश्रेष्ठ आहे आणि त्या जातीची माणसं खालच्या जातींना, त्यातल्या त्यात हीनतम जातीच्या अस्पृश्यांना सदा चेपत असतात, हेही बहुतेकांना माहीत आहे.
मला तर हे प्राथमिक शाळेत असतानाच माहीत होतं. पण, नाझींच्या जर्मनीमधील छळछावण्यांबद्दल तेव्हा काहीच माहीत नव्हतं. त्याच्या काही वर्षं आधी वसाहतीमधील गुलामांवर होणाऱ्या अत्याचारांची माहिती झाली होती. तरीही, भारतीय जातींमधील ब्राह्मण अत्यंत दुष्ट असल्याचं तर १९६०च्या आरंभी, बव्हेरियाच्या अभ्यासक्रमातच शिकवलं जात असे. आणि ते कार्य (!) आजही चालू आहे. काही दिवसांपूर्वी ऋषिकेशमध्ये मला भेटलेल्या तीन जर्मन युवकांना मी विचारलं, “भारताचा कोणता विशेष तुम्हाला जाणवला?” “जातिव्यवस्था,” असं ते चटकन म्हणाले. ती अत्यंत अमानुष असल्याचं तेही शिकले होतेच की. बहुतेक सर्व जगभरच, भारतातील जातिव्यवस्था अत्यंत अमानुष असल्याचं लहान मुलांना शिकवलं जातंच. असं का?
तर, त्यामागं एक सुप्त सुसूत्र कारस्थान आहे.
जातिव्यवस्था आहे आणि अस्पृश्यताही आहे, हे खरं आहे. पण, तशी सर्व जगभरच आहे! पोर्तुगालात जाति म्हणजे वर्ग. ती भाषा भारतासारखी नाही. प्राचीन काळातील वेदांत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आणि शूद्र, अशा चार वर्णांची माहिती आहे. ते समाजपुरुषाचं अविभाज्य अंग आहे. मानवी शरीराला जसे, मस्तक, हात, मांड्या आणि पावलं असतात, तसेच हे वर्ण होत. ही उपमा खरोखर सुंदर आहे. कारण, शरीराचे सर्वच अवयव महत्त्वाचे असतात, असं त्यांतून सुचवलं जातं. मस्तकाला सर्वाधिक मान मिळतो, हे खरं. पण पाय नसले तर चालेल का? प्रत्येकच अवयव डोक्याचं काम करू शकेल का? शेतकरी, व्यापारी, कामगार नसतील तर समाजाचा गाडा चालेल का? प्रत्येक अवयवाची एकेक भूमिका आहे. पुढच्या आयुष्यांत कदाचित ह्या कामांत कदाचित, अदलाबदलही होईलही.
आणि वर्ण मुळात आनुवंशिक नव्हतेच. ते प्रत्येकाच्या गुणानुसार आणि व्यवसायानुसार ठरत. ब्राह्मणांचं काम वेदांचं पठण करून ते सातत्यानं स्मरणात ठेवणं हेच असे कारण ते अचूक रूपात पुढच्या पिढ्यांना पोचणं आवश्यक होतं. त्यामुळंच त्यांना प्रमुख्यानं सत्त्वगुणांचं सातत्य राखावं लागे. आणि स्वतःच्या शुद्धतेकरता इतर वर्णांपेक्षा अधिक कठोर नियमांचं पालनही करावं लागे.
वेदांचं शुद्धत्व राखणं हे ब्राह्मणांचं कर्तव्य असे. त्यामुळं, प्राण्यांच्या मृत शरीराची विल्हेवाट लावणाऱ्यांचा, रस्ते सफाईकामगारांचा स्पर्श स्वतःला होऊ न देण आवश्यक असे, हे समजण्यासारखं आहे. आणि असली काम करणाऱ्यांचीही समाजाला आवश्यकता असतेच. असल्या कामगारांशी हस्तांदोलन न करण्याची प्रथा पश्चिमेकडेही आहेच की!
सत्त्वगुण राखण्याकरता समाजातल्या इतर गटांत न मिसळणं आवश्यक असेच. निम्न स्तरावरील लोकांना हीन मानण्याची प्रथा पाश्चात्त्य देशांतही आहेच की. पण कालांतराने, वर्ण आनुवंशिक मानले जाऊ लागले. आजच्या युगात कित्येक ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, जन्माबरोबर आलेल्या आपापल्या विहित कर्तव्यांचं पालन तरी कुठं करताना दिसतात. त्यामुळं आता त्यांनी आनुवंशिक वर्णाचाही आधार घेणं उचित नाही.
पण, जर पश्चिमेकडील उच्च प्रकारचं काम करणारे, हलकं काम करणाऱ्या शेजारच्या लोकांत मिसळायला सिद्ध नसताना त्यांना दोष देत नाहीत, तर मग भारतातल्या वर्णपद्धतीवर ते सातत्यानं का तुटून पडतात?
कर्नाटकातल्या मडिकेरी क्लबात, आणि देशभर अन्यत्रही, ब्रिटिश केवळ गोऱ्यांनाच प्रवेश देत असताना कोणी अस्वस्थ का होत नाही, असं मला एका वृद्ध सद्गृहस्थानं विचारलं. एका क्लबात असलेल्या, “कुत्र्यांना आणि भारतीयांना प्रवेश नाही,” अशी पाटी आपण वाचल्याचंही ते म्हणाले.
ब्रिटिशांच्या शेतकीविषयीच्या धोरणामुळं ब्रिटिश वसाहतीमधील २,५ कोटी भारतीय पुरुष, स्त्रिया, मुलं, कित्येक दिवसांत पुरेसं अन्न न मिळाल्यामुळं उपासमारीनं मेले, त्यामुळं कुणीच कसं अस्वस्थ झालं नाही? शरीरात केवळ हाडं आणि सुरकुतलेली कातडी अशा आसन्नमरण भारतीयांची चित्र महाजालावर पाहायला मिळतात. तरीही कुणी अस्वस्थ नाही.
गुलामीची पद्धत बंद झाल्यानंतरही ब्रिटिश भारतातून कित्येकांना जगभर गुलाम म्हणून, तेही एकेका बोटीत सहस्रावर लोकांना कोंडून नेत. त्यामुळं प्रवासातच कित्येकांचं मरण ओढवे. आणि जे जगत त्यांचा पराकोटीचा छळ करण्यात येई. पण, मग तेव्हा का कुणी अस्वस्थ झालं नाही?
मुस्लीमांनी भारतावर आक्रमण केलं. आणि तेथील समाजाचा छळ केला. त्यातही ब्राह्मण समाजाचा विशेष केला. तरीही कुणी अस्वस्थ झालं नाही ते का? त्यांना त्यांनी किती क्रौर्यानं वागवलं? मुस्लीम सैन्याकडून होणाऱ्या बलात्कारात होणारं आपलं शीलरक्षण करण्याकरता किती स्त्रियांनी अग्नीत उड्या घेतल्या? कोणी अस्वस्थ झालं?
आणि आजकाल इसिस? डाव्या विचारसरणीचे आणि मोठे सभ्य समजले जाणारे ब्रिटिश संसदेचे खासदार हे सगळं जाणतात. पण, त्यांना ह्या कशाची चिंता आहे? त्यांना भारतात झालेल्या अमानुष जातिव्यवस्थेची मात्र चिंता आहे. उलट, आपलं राज्य सातत्यानं टिकावं म्हणून १८७१च्या जनगणनेत जातिनिहाय नोदणी करून त्यांनीच जातीजातींतील भेदभाव वाढवला. आणि आता भारतातील राजकीय सत्ता गेल्यानंतरही माध्यमांमार्फत आपल्या देशात जातिविद्वेष वाढावा असे निर्बंध ते संमत करून घेत आहेतच.
ब्राह्मणांनी स्वतःचा मोठेपणा टिकवण्याकरता केलेले अत्याचार, ख्रिश्चन वसाहतवाद्यांनी आणि मुस्लीम आक्रमकांनी केलेल्या अत्याचारांच्या तुलनेत क्षुल्लक. नगण्य ठरतात, हे मला स्पष्ट करायचं आहे.
मग भारतातील जातिव्यवस्थेमुळं झालेल्या छळवादावर इतका आरडाओरडा करण्याचं काय कारण आहे? त्याचं कारण, आपले स्वतःचेच अधिक गंभीर अपराध जगापुढं येऊ नयेत, आणि आपण भारतात केलेल्या छळवादाच्या कहाण्या जगाला कळू नयेत, म्हणून तर हा आटापिटा आहे. उलट, राजकीय धोरणामागं छपून चाललेल्या आरक्षण-व्यवस्थेतून, अल्पसंख्यांकांना आणि निम्न जातींना मिळणाऱ्या सवलतींमुळं आज आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असूनही त्यांच्यांतल्याच कित्येकांची अवस्था बिकट आहे.
पण, जगभर ब्राह्मणांना आणि जातिव्यविस्थेला चोपलं जात आहे, त्यामागं इतकंच कारण नाही. ब्राह्मणांना कमीपणा वाटावा, अपराधी वाटावं, आपल्याच पूर्वजांची लाज वाटावी आणि त्यांनी आपल्याच महान वेदांच्या अभ्यासापासून आणि विद्यार्थ्याना ते शिकवण्यापासून परावृत्त व्हावं, ह्यासाठी जाणून बुजून काही योजना चालू आहेत. तर वैदिक ज्ञानामुळं ख्रिश्चनतेला आणि मुस्लीमतेला असलेला धोका त्यांना दिसू लागला आहे. ज्या ते तत्त्वांना सत्य म्हणतात, त्यांना मी सहज आव्हान देऊ शकते. वैदिक ज्ञान अर्थपूर्ण आहे. आणि जगभर ख्रिश्चनता किंवा मुस्लीमता ह्यांचा प्रसार होण्याकरता त्याचा मोठाच अडथळा होणार आहे.
दुर्दैवानं, वैदिक ज्ञानातील फार मोठा ठेवा आज लुप्त झाला आहे.कांचीपुरमचे पूर्वीचे शंकराचार्य, श्री. चंद्रशेखरानंद सरस्वती आपल्या पुस्तकात लिहितात, वेदव्यासांनी ५,०००वर्षांपूर्वी ११८० शाखाचे चार भाग केले. पैकी आज आठच श्लोक उपलब्ध आहेत. (हा बहुमोल ठेवा, इंग्लंड, जर्मनी आणि इतर देशांतून सापडेल काय? अशी शंका माझ्या मनात आहे.)
भारतामधील ब्राह्मणांना ठोकण्याचं आणि जातिव्यवस्था मानवसमाजावरील कलंक आहे, असा आरडाओरडा करण्याचं थांबवण्याची वेळ आता आली आहे. वस्तुतः इसिसच्या तुलनेत तर त्याचा धोका मुळीच नाही. फार काही सांगायची आवश्यकता नाही. पण सैनिकांशी शरीरसंबंध करायला नकार दिल्याकारणानं १९ यझदी स्त्रियांना पोलादी पिंजऱ्यात कोंडून जिवंत जाळण्यात आलं. त्याच्याशी तुलना करता तर ब्राह्मणांची निंदा करण्याचं इतकंसंसुद्धा कारण नाही.
काही दिवसांपूर्वीचीच कथा. दक्षिणेतील एका मंदिरात मी गेले होते. तिथं एक ब्राह्मण जोडपं उभं होतं. हातापायांच्या काड्या झालेल्या अवस्थेत दोघं रांगेत प्रसादाकरता माझ्यापुढंच उभे होते. पण एकदा प्रसाद घेतल्यानंतर दोघंजण पुन्हा रांगेत उभे राहिले. दारिद्र्याविना दुसरं काय कारण असेल?
आपल्या पूर्वजांच्या बाबतीत ब्राह्मणांना मुळीच अपराधी वाटायला नको. उलट, त्यांना त्यांचा अभिमानच वाटायला हवा. कारण, केवळ त्यांच्यामुळंच प्राचीन भारताच्या ज्ञानाचा असला अमोल ठेवा टिकून राहिला आहे. अपराधी वाटायला हवं असेल तर ते हिंदुत्वाची जे टवाळी करीत आले आहेत, त्यांनाच वाटायला हवं. ब्राह्मणांविरुद्ध आणि हिंदुत्वाविरुद्ध द्वेष पसरवणं मुळीच समर्थनीय नाही.
Feature Image: rediff.com