गणपती देव आहे काय?
The article has been translated into Marathi by Professor Manohar Railkar
सामान्यतः अन्य संप्रदायांवर हिंदु कधीही टीका करीत नाहीत. उलट, ख्रिस्ती आणि इस्लाम संप्रदाय हिंदुधर्मावर नुसती टीकाच करतात असं नाही, तर ते त्याची निंदाही करीत असतात. डॉ. झाकीर नाईक, म्हणजे असल्या प्रकारात मोडणारं उदाहरण होय. भारताबाहेर चर्च आणि मशिदींतून कसल्या प्रकारची प्रवचनं होतात, त्याची हिंदूंना कल्पना तरी आहे काय? हिंदूंच्या देवदेवतांना ख्रिस्ती मिशनरी सैतान, राक्षस असं काहीही म्हणतात. तरीही हिंदू त्याचा प्रतिवाद करीत नाहीत आणि पोथीनिष्ठेतून त्यांनी केलेल्या त्या निंदांना आव्हानही देत नाहीत. वास्तविक हिंदूंच्या धर्माला आणि श्रद्धांना तत्त्वज्ञानाची भरभक्कम बैठक आहे, तशी ख्रिस्ती किंवा इस्लाम ह्यांना मुळीच नाही.
काही वर्षांपूर्वी झाकीर नाईकांनी गणपतीची कुचेष्टा केली आणि तो एक देव आहे, असं सिद्ध करावं असं आव्हानही दिलं. त्यांच्या मते मुस्लीमांचा अल्लाच सर्वश्रेष्ठ आहे.
पण अल्लाविषयी आपल्याला काय माहीत आहे?
प्रथम, अल्ला सर्वशक्तिमान आणि दयाळू आहे, पुन्हा हे श्रद्धाळूंना आणि अश्रद्धांना दिवसांतून पाचदा मोठमोठ्यानं सांगितलं जातं. प्रत्येक मनुष्यप्राणी दिवसभर काय करीत असतो, तेही सगळं त्या अल्लाला कळतं, त्या प्रत्येकाकरता तो स्वतंत्र असतो. अल्लानं आपले शेवटचे शब्द महंमद नावाच्या आपल्या प्रेषिताला सांगून ठेवले आहेत, असा दावा केला जातो. तसं कुराणातही लिहिलं आहे. केवळ इस्लामच सत्य असल्याचं अल्लानं सांगितलं आहे. अन्य सर्व मार्ग चुकीचे असल्यानं प्रत्येकानं इस्लामलाच अनुसरलं पाहिजे. आणि प्रत्येकाला केवळ एकच जन्म असल्यानं त्यांनी घाई करायला हवी, असंही म्हटलं आहे.
ह्या जीवनात जे इस्लामचा स्वीकार करणार नाहीत, त्यांना अंती नरकाग्नीमध्ये जळत राहावं लागेल. त्यांच्या डोक्यावर उकळतं पाणी ओतलं जाईल आणि त्यामुळं त्यांचे बाह्य आणि अंतर्गत अवयवसुद्धा वितळून जातील. (कु२२.१९-२२)
म्हणजे अल्लाचा दयाळूपणा इथं अंत पावतो. त्याला मतभेद सहन होत नाहीत. दयालुत्वानं सुरू झालेलं अझान इथं “हे अल्ला, आम्हाला योग्य मार्ग दाखव. आणि ज्यांच्यावर तुझी कृपा आहे, त्यांनाच दाखव, ज्यांच्यावर राग आहे, त्यांना नव्हे,” ह्या प्रार्थनेबरोबर संपतं (अल् फतिहा १).
म्हणजे जे अल्लाचे अनुयायी आहेत, त्यांच्यांवर म्हणजेच केवळ मुस्लीमांनाच तो दया दाखवतो. ज्यांच्यावर त्याचा राग आहे त्यांच्यांवर म्हणजे मुस्लीमेतरांवर तो दया दाखवीत नाही.
डॉ. झाकीर नाईक, इस्लामची मी इथं मांडलेली कल्पना बरोबर आहे, असं वाटतं. कारण ख्रिश्चनतेमध्येही तशीच मांडली आहे. आणि ती कल्पना सत्य नाही, असा माझा दावा आहे. तुम्ही आपलं म्हणणं सिद्ध कराल काय? (ख्रिस्ती पाद्र्यांनाही माझं हेच आव्हान आहे) अल्ला किंवा गॉड इतका अन्यायी आणि भेदाभेद करणारा असेल, असं वाटत नाही. अंतिम निर्णयानंतर कोट्यवधी लोक जिच्यात जळत राहतील अशी मोठी भट्टी असेल, हे तुम्ही सिद्ध करू शकाल का? आपल्या कळपातील मेंढरांनी कळप सोडून जाऊ नये, म्हणून त्यांना घाबरवण्याकरताच ही भीती दाखवली जात आहे का? फोडा आणि झोडा?
ख्रिस्ती धर्म सोडून गेलात तर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होणार नाही, असं ज्यांना ज्यांना सांगितलं जातं, असे २ अब्ज ख्रिस्ती लोक आहेत. तद्वतच तुम्ही मुस्लीम धर्म पाळला नाहीत, तर तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही, असं ज्यांना सांगितलं जातं, असेही अदमासे २ अब्ज मुस्लीम आहेत. आता ह्यातला कोणता दावा सत्य आहे, हे पडताळून पाहण्याकरता ह्या दोघाही संप्रदायांना, भरपूर अवधी मिळाला होता. पण तसं कुणीच केलं नाही. का? कारण ते सिद्ध करता यायचंच नाही. ते केवळ दावेप्रतिदावे करीत राहतात आणि आपापसांत लढाया करतात, किंवा मुस्लीम-ख्रिस्ती आणि (त्यांच्या कल्पनेतील) नास्तिक ह्यांच्यांत लढाया होतात. पुन्हा गेली २,००० वर्षं असंच चालू आहे.
अशा परिस्थितीत ख्रिश्चनता किंवा इस्लाम मनुष्य समाजाला लाभदायक आहे, असं कुणी म्हणू शकेल का? निर्भेळ सत्य नेमकं काय, कसं आहे, हे पडताळून पाहण्याची वेळ अजूनही आली नाही का?
डॉ. झाकीर नाईक, भारतीय ऋषी तुमचेही पूर्वज आहेत. ह्या भारतीय ऋषींनी ह्यात अत्यंत मोलाचा सहयोग दिला आहे. त्याचा तुम्हालाही अभिमान वाटायला अडचण नाही. फार, फार, फार वर्षांपूर्वी, ख्रिश्चनता आणि इस्लाम क्षितिजावर दिसण्यापूर्वी सहस्रावधी वर्षं आधी त्यांनी मोलाचं सत्य प्रतिपादलं आहे. ब्रह्म हेच सत्य, सर्वशक्तिमान, (ख्रिस्ती संप्रदायानुसार गॉड) आहे. ब्रह्म म्हणजे कुणी व्यक्ती नव्हे, वा आकाशात वास्तव्य करणारी अतिमानवी शक्ती नव्हे, ती पुरुषही नाही वा स्त्रीही नव्हे, त्याला कुणाचाही हेवा नाही, त्याला मानलं नाही म्हणून सूढबुद्धीनं. तो कुणाला शिक्षाही करीत नाही. तर ते सत्-चित्-आनंदृ-रूप असं ते एक शाश्वत तत्त्व आहे. त्याला सहस्रावधी नावं आणि सहस्रावधी रूपं आहेत. जसं समुद्राच्या सहस्रावधी लाटांखाली मुळात समुद्रच सत्य असतो, तसंच.
हे दृश्य विश्व भासमान आहे, हे त्या ऋषींनी जाणलं होतं, त्याला त्यांना माया म्हटलं. ती भासमान असते, सत्य नसते.
निर्भेळ सत्य नेहमी सदासर्वदाच सत्य असतं. ते भूतकाळात होतं, वर्तमानात आहे आणि भविष्यातही असेल. आणि ते स्वयंसिद्ध असतं.
आत्मचिंतनातून ऋषी ह्या निष्कर्षावर आले. ह्या कसोट्यांवर केवळ चैतन्य हे एकमेव तत्त्व उतरतं. ते सर्वव्यापी आहे. पण आपण ते जाणत नाही. कारण आपलं ध्यान वस्तू, विचार किंवा भावना इत्यादीं भौतिक वस्तूंपुरतंच असतं. अंधेऱ्या खोलीत आपण, दिवा घेऊन गेलं तर आपल्याला तिथल्या वस्तू दिसतात. पण सर्वत्र भरून राहिलेल्या अवकाशाचं आपल्याला भान नसतं. तद्वतच अनंत अवकाशही जीवन आणि प्रेम ह्यांनी भरून राहिला असल्याचं आपल्याला कळत नाही. सत्-चित-आनंद, किंवा सर्व नामरूपांचा आधार असलेलं निर्भेळ सत्य ह्या दृष्टांतामुळं समजेल.
आधुनिक विज्ञानानं सत्यामागील सत् चा म्हणजे सर्वांच्यातल्या एकात्मतेचा छडा लावला आहे. चित् चाही त्यांना पत्ता लागला आहे आणि आनंद म्हणजे काय तेही त्यानं जाणलं आहे. वैज्ञानिकांनी आता बाहेरची दृष्टी आत वळवून स्वतःमधील सत् चा शोध घेण्याकरता अंतर्मुख होण्याची आणि त्या मार्गानं संशोधन चालवण्याची आवश्यकता आहे. ऋषींनी मांडलेल्या तत्त्वांपर्यंत वैज्ञानिक भविष्यात तरी पोचतात का, आणि “त्या” आनंदाचा अनुभव घेतात की कसं ते पाहू या.
डॉ. झाकीर नाईक, तुमचा एक विचार बरोबर आहे, सत्य एकच असतं. ज्ञाते मंडळी त्याला विविध नावांनी ओळखतात. पण, त्याविषयी लिहितानं तुम्ही एक चूक केली आहे. तुम्ही सांगता तसं ते सत्य मुस्लीमेतर किंवा ख्रिस्तीतर, कुणालाही नरकाग्नीत ढकलणार नाही. कारण, ते तत्त्व महान असून अत्यंत करुणामय आहे.
पण गणपती देव आहे की नाही, ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे नाही का?
तुमच्याच पूर्वजांची ही परंपरा काय होती, ते मी तुम्हाला किंचितशी स्पष्ट करून सांगू शकेन. खरं म्हणजे मला ती जेव्हा कळली तेव्हा तिच्या भव्यदिव्य दर्शनामुळं मीसुद्धा काहीशी विस्मयचकित आणि अवाक झाले होते. मात्र, सनातन धर्मातील सत्-चित-आनंद हे तत्त्व केवळ बुद्धीच्या आधारावर समजण्यासारखं नाही, तर त्याचा साक्षात्कार व्हावा लागतो. कारण, ब्रह्मन् सर्वव्यापी असतं, ते तुमच्याआमच्यातही असतं (अयमात्मा ब्रह्म।) त्याचा अनुभव घेता येतो. पण, त्याकरता काही नियमांचं पालन करायला हवं. प्रथम आत्मशुद्धी व्हायला हवी, नैष्ठिकतेचं पालन करायला हवं, सत्य बोलायला हवं, इत्यादी. भरपूर मांसाहार आणि भरपूर कामोपभोग, आत्मशुद्धीला मारक असतात. तरी एक बाब अत्यावश्यक असते. भक्ती आणि परमेश्वराबद्दल निरपेक्ष प्रेम.
इथं हिंदुधर्मातील ईश्वराचा उल्लेख येतो.
अब्राहमनी संप्रदायांतील ईश्वराची कल्पना हिंदूंच्या ईश्वराच्या कल्पनेच्या जवळ जाणारी असली तरी हिंदूंचा ईश्वर अधिक कनवाळू आहे. अश्रद्धांना जाळणारा कसल्याही प्रकारचा अंतिम नरकाग्नी त्यांच्यांत नसतो. जन्मजन्मांतरानंतरही आपापला उद्धार करून घेण्याची संधी प्रत्येकाला असते. लाट समुद्रापेक्षा कधीच वेगळी नसते, तसाच प्रत्येक मनुष्यप्राणी ईश्वराहून वेगळा नसतो. तो त्याचाच अंश असतो.
ईश्वराला अगणित अंगं असतात. आपल्या विश्वालासुद्धा असंख्य अंगं नसतात का? माणसांचेसुद्धा अगणित प्रकार असतात. त्यामुळं त्या त्या माणसाला भावणारे देवतांचेही अनेक प्रकार आढळतात. आणि आपल्याला आवडणाऱ्या देवतेची भक्ती करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं. त्यातूनच निराकार निर्गुण सत्याप्रत जाता येतं. गणपतीसुद्धा त्यातलीच एक देवता होय.
ख्रिश्चनांनी आणि इस्लाम पंथीयांनी ह्या देवतांची अकारण कुचेष्टा केली आहे. त्या देवता कुणी स्वतंत्र देव नव्हतच. त्या एकाच सत्याची, ब्रह्माची लोकांनी आपापल्या आवडीनुसार मानलेली रूपं असतात. कारण मग त्या भक्ताला भक्ती करणं सोपं जातं. सर्व देवता त्या एका ब्रह्माचीच रूपं असल्याचं ग्रंथांना मान्य आहे.
आणि डॉ. नाईक, गणपती ही देवता सर्वशक्तिमान आहे की नाही, ह्या तुमच्या शंकेचं उत्तर इथं मिळू शकेल.
गणपति-अथर्वशीर्ष म्हणजे अथर्ववेदाचाच भाग असलेलं एक उपनिषद आहे. “त्वमेव केवलं कर्ता%सि, त्वमेव केवलं धर्ता%सि, त्वमेव केवलं हर्ता%सि। त्वमेव केवलं ब्रह्मासि। त्वं साक्षादात्मा%सि नित्यम्।”
म्हणजे तूच सर्व सृष्टीचा निर्माता आहेस, तूच तिचं धारण करणारा आहेस आणि अंतिमतः तुझ्यातच त्याचा लय होणार आहे. ही सर्व त्या ब्रह्माचीच रूपं असून तूच ते ब्रह्म आहेस. पण, हे केवळ गणपतीलाच लागू आहे, असंही नाही. ते अन्य कुठल्याही देवतेला लागू असतं. कारण कोणतीही देवता सर्व त्या ब्रह्माचंच रूप होय. तोच आत्मा होय.
अर्थात हे सर्व पवित्र ग्रंथात लिहिलं आहे, म्हणूनच ते सत्य आहे, असंही नव्हे. जगात असे किती तरी पवित्र ग्रंथ उपलब्ध आहेत, त्यांत लिहिलेलं सर्वच सत्य आहे, असं अंधपणं गृहीत धरण्यानं अनर्थ होईल. एखादं वचन सत्य असल्याचं प्रतिपादन केलं असेल तर ते तर्क, विचार आणि अनुभव ह्यांच्या कसोटीवर उतरायला हवं. आणि एखादं विधान ह्या कसोट्यावर उतरलं नाही, तर ते विश्वासपात्र ठरणार नाही. आणि त्याच्याकरता आपलं जीवन पणाला लावण्याचं कुणाला कारणही नाही.
सर्वच देवता ब्रह्म आहेत कारण केवळ ब्रह्मच काय ते सत्य आहे. ब्रह्म एखाद्या सागरासारखं आहे. त्यावर उठणाऱ्या लाटा सागराहून भिन्न नसतात. कोण कोणत्या नावानं त्याची भक्ती करतो हे महत्त्वाचं नव्हे. तर भक्त भक्ती किती आर्ततेनं करतो ते महत्त्वाचं आहे. गणपतीची भक्ती करणारे लक्षावधी हिंदू लोक जगात आहेत. ती भक्ती म्हणजेसुद्धा सत्-चित्-आनंदाकडे जाण्याचं एक प्रवेशद्वारच आहे.
सनातन धर्म फार प्राचीन आहे. तरीही त्या ऋषींची दृष्टी किती खोलवर पोचली होती. जग ही निखळ सत्याचं भासमान अभिव्यक्ती होय. जसं अंधारात दोरी पाहिली तरी आपल्याला सर्पाचा भास होतो. पण प्रत्यक्षात तिथं एक दोरीच असते. आणि जग भासमान असून ब्रह्मच सत्य (ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या।) आहे, असं हिंदु म्हणतात, म्हणून पाश्चात्त्यांनी हिंदूंची कुचेष्टा केली. पण तेच सत्य असल्याचं प्रतिपादन करून विज्ञानानं आता हिंदूंच्या म्हणण्यालाच पुष्टी दिली आहे.
उल्कांचा डीएनए कसा बनला ह्याचा शोध नासानं नुकताच घेतला. जर्मनीमधील मॅक्स प्लांक संस्थेनं अखिल विश्वाच्या आकाराचं एक मानचित्र नुकतंच प्रसिद्ध केलं. ते अंडाकृती आहे, असं त्यावरून कळतं. शिवलिंगाची भक्ती करणाऱ्या हिंदूंची टिंगल करणारे आता आपल्या त्या वर्तनाचा पुनर्विचार करायला सिद्ध होतील का की आता त्यांनाच काहीसं अपराध्यासारखं वाटू लागेल?
भारतातल्या प्राचीन सभ्यतांत कैक महान व्यक्ती उदयास येऊन गेल्या. काहींना तर देवतांचं स्थान प्राप्त झालं. त्यात काहीच चुकीचं नाही. कारण सर्वांमध्येच देवत्व वास करतं.
ऋषींना जे अंतर्ज्ञानानं कळून आलं त्याला आता विज्ञानानं पुष्टी दिली आहे, ते, डॉ. नाईक, तुम्हाला समजू शकेल. उदाहरणार्थ. विश्वाचं वय आणि सर्व जीवांमधील एकत्व.
भारतीय परंपरांची जी दुष्कीर्ती तुम्ही आणि अन्य काहीजण करीत असता तिला एका प्रकारानं यश मिळालं आहे. त्याचं कारण, ब्रिटिशांनी भारतीयांना आपल्या परंपरांपासून तोडण्यात आहे. परिणामी कित्येकांना आपल्या परंपरांचं प्राथमिक ज्ञानही मिळालं नाही. तरीही तुम्ही प्रामाणिक असाल तर तुमच्या ह्या पूर्वजांचं हे बुद्धिवैभव तुम्ही समजून घ्याल, आणि त्यांचं कर्तृत्व अब्राहमनी संप्रदायांच्या कैक पटीनं उत्तुंग असल्याचं तुम्हाला कळेल. “आम्हीच काय ते बरोबर आहोत, आणि तुम्हाला आमच्या संप्रदाय मान्य नसेल तर जा पडा नरकात,” ह्या वृत्तीमुळं मनुष्यसमाजाची फार मोठी हानी होत आली आहे. जगावर अधिकार गाजवायला तिचा उपयोग होत असेलही. पण सर्वांनी एकाच आकाराचे कपडे-पादत्राणं घालावीत हा नियम असलेल्या जगातच तुम्ही राहू इच्छिता का?
डॉ. नाईक, मी जर तुमच्या जागी असते तर मला एकाच बाबीची चिंता लागली असती: मेल्यानंतर तुम्ही जागे झालात आणि इथं तुमच्यासाठी स्वर्गबिर्ग काहीच ठेवलेलं नाही, असं आढळल्यावर तुमचं काय होईल? आणि तुम्ही प्रेरणा दिलेले जिहादीसुद्धा (मरूनही) स्वर्ग न दिसल्यामुळं तुम्हालाच दूषणं देतील काय? तुम्हाला पुन्हा एखादा जन्म मिळाला आणि ह्या जन्मात सातत्यानं जाणताअजाणता सत्याचा विपर्यास करीत राहिलात, त्या जन्मातल्या तुमच्या कर्मांची फळं तुम्हाला त्या नव्या जन्मातच भोगावी लागली तर? पुनर्जन्माचा केवळ उल्लेख हिंदूंच्या ग्रंथांतच आहे, असंही नव्हे. तर त्याचे कित्येक पुरावेही उपलब्ध आहेत. व्हर्जिनिया विद्यापीठात आतापर्यंत ३,०००हून अधिक प्रकरणं नोंदली आहेत.
डॉ. नाईक ज्या तत्त्वाचं तुम्ही प्रतिपादन करता त्या तत्त्वावर तुमचा स्वतःचाच तरी कितपत विश्वास आहे, ते मला माहीत नाही. बालपणापासून सातत्यानं एकच बाब ठसवण्याचा परिणाम किती होतो, ते मी स्वतः अनुभवलं आहे. पण, त्या मानसिक अवस्थेतून बाहेर पडणं शक्य असतं, तेही मला माहीत आहे. आणि ते सोपंही असतं.
ख्रिस्ती संप्रदायाच्या जोखडातून बाहेर पडल्यावर मला फार मोठी मानसिक सुटका झाल्यासारखं वाटलं. आणि तुम्हीसुद्धा खरोखरीच खऱ्या सत्याचा शोध घ्यायला लागावं, असं मी सांगू इच्छिते. ईश्वराबद्दलची तुमची कल्पना सत्य नाही. तुम्ही एका पुस्तकाचा आधार घेता. पण ती बाब कोणत्याही पुस्तकाच्या आवाक्यात येणारी नाही. सत्य खऱ्या अर्थानं अस्तित्वात असतंच.
तुमचेही पूर्वज असलेले भारतीय ऋषी स्वानुभवाच्या आधारानं बोलत, केवळ पुस्तकातील माहितीच्या आधारावर बोलत नसत.